काजव्यांनसोबतची ती रात्र.

    तसा भटकंती हा नेहमीच जिव्हाळ्याचा विषय तरीदेखील काजवा महोत्सव हा दोन वर्षापासून राहून गेलेला होता परंतु यावर्षी शेवटी त्यांचा योगायोग आलाच, अविस्मरणीय अनुभव होता… तब्बल 17 किलोमीटर आम्ही चालत राजमाचीच्या दिशेने जात होतो पण ज्यावेळी काजव्यांची लखलखाट पाहिली त्यावेळी पूर्ण थकवा गळून पडला. असा अनुभव खरं तर लिहून किंवा वाचून कधीच मिळत नाही , तो अनुभवावा लागतो आणि त्यासोबत सह्याद्रीच्या तुम्ही प्रेमात असाल तर सोने पे सुहागा अशी काहीशी परिस्थिती होतेच.

     राजमाची, काजवे जंगलातून मातीच्या रस्त्यावरून चालणं आणि मग दिसणारा नजारा हे सगळं खरं तर गेली दोन वर्ष माझ्या डोक्यात सतत होतं, पण दोन वर्षापासून राहून गेलेला हा ट्रेक यावेळी अखेर घडलाच. लाखो काजव्यांच्या कल्पनेने आमच्या डोक्यामध्ये अगोदरच काजवे चमकत होते.  आणि ते प्रत्यक्षात बघण्यासाठी हा ट्रेकचा प्लॅन कौस्तुभ ने त्याच्या मित्रांसोबत ठरवला.. परंतु ट्रेक ला जाण्याच्या अगोदरच त्यामधले नेहमीप्रमाणे एक-एक जण कमी होत गेले..  आणि शेवटी आम्ही चौघं उरलो, त्यामध्ये कौस्तुभ आमचा टीम लीडर, रुतुजा त्यांची टीम लीडर, श्रद्धा इतिहासाचा खोल अभ्यास असणारी आणि मी.

Rajmachi Fireflies Festival, Trek to rajmachi
Rajmachi Fireflies Festival

    आयुष्य जेव्हा खडतर वाटेल , तेव्हा तुम्ही ट्रेकिंगला जा. जेव्हा आयुष्यात खुप अडचणी आहेत असं वाटेल तेव्हा तुम्ही ट्रेकिंगला जा , या अडचणी तुम्हाला छोट्या वाटू लागतात… आयुष्यात आपण प्रत्येक ठिकाणी खूप कमी पडतोय असं वाटेल तेव्हा आपल्यातल्या कणखरपणा तुम्हाला इथेच सापडेल. सह्याद्री हा नेहमी प्रत्येक ट्रेकर्ससाठी मार्गदर्शक म्हणून त्यांच्या पाठीशी उभा असतो. जेव्हा निसर्ग आम्हाला खुणावतो तेव्हा आम्ही घराबाहेर मुंग्यांसारखे पडतो… प्रत्येक वेळी जाऊन  देखील या वाटा नव्याने उलघडतात आणि याच उलघडलेल्या प्रवासाची ही गोष्ट…. 

  नवीन नवीन मित्र , नवीन नवीन ठिकाण, नवीन नवीन प्रदेश , नवीन नवीन माणसं, असं सर्व काही अनुभव पुन्हा पुन्हा नव्याने ताजा होतो , आणि सह्याद्रीच्या कुशीतला हा मोह कधीच आवरता येत नाही. आणि त्यात दिवाळीमध्ये फटाक्यांचा लखलखाट व्हावा असा अनुभव वळीवाच्या दिवसात काजव्यांचा लखलखाट दिसतो. आणि हाच लकलकाट पाहण्यासाठी जवळपास वीस किलोमीटर पाय तोड करत आम्ही तुंगार्लि मार्गे राजमाचीला निघालो प्रत्येक ग्रुप मध्ये अजून किती किलोमीटर चालायचं आहे असा विचार करणारा एक जण असतोच आणि तो यावेळीही होताच.. आणि ग्रुपमध्ये एक जण खूप इतिहासाची माहिती सांगणारा नवीन नवीन राज्यांची माहिती देणारा असा एक जण  असतोच. यांच्या मुळे रास्ता कसा संपत आला हे कळत देखील नाही. असा आमचा गप्पा मारत प्रवास फुकट्याकडुन  राजमाची किल्ल्याकडे सुरू झाला…

वेळ संध्याकाळी साडे पाच ची आम्ही लोणावळा पासुन रिक्षा करून तुंगार्लि या गावात उतरलो आणि तिथुन पुढे चालत ट्रेक ला सुरवात केली…  साडेसहाच्या सुमारास सूर्य तळकडे आला की  हीच ती वेळ हाच तो क्षण फोटो काढण्याचा. सूर्यास्त होताना फोटो छान येतात.  ट्रेकला आलेले बरेचसे ग्रुप होते त्यामुळे रस्त्यात खूप गर्दी होती आणि त्यांना खूप सारे इन्स्ट्रक्शन फॉलो करावे लागणार होते. तसे आम्हाला कुठल्याही सूचना वगैरे नव्हत्या आमच्यासोबत एक ट्रेकर्सचा ग्रुप होता. त्यांना म्याव म्याव असं म्हणत पुढे जायला लावलं होतं. हे का आणि कशासाठी हे मला माहीत नाही पण हे छान होतं … आम्हीदेखील म्याव म्याव करत त्यांच्या पुढे निघून गेलो.  जसा जसा अंधार होत होता तसे तसे पाय देखील दुखत होते. पाय खूप दुखत असल्यामुळे आम्ही मध्ये मध्ये थांबत होतो. आणि पुन्हा नव्याने सुरवात…

Rajmachi fireflies Festival
Rajmachi Fireflies Festival

 हळूहळू अंधार पडत गेला आणि मग सुरुवात झाली घनदाट जंगलाची आणि या जंगलात लाइटिंग ची माळ लावावी तसे काजवे टीमटीमताना  दिसू लागले. खरंतर सतरा किलोमीटर नंतर जेव्हा हे दृश्य पाहिलं तेव्हा आळस सारा गळून पडला आणि अंतर्मनामध्ये आनंदाच्या लाटा येत होत्या. आमची टीम लीडर रुतुजा बऱ्याचदा आम्हाला सोडून पुढच्या ग्रुप सोबत निघून जात असे, मग तिला सांगावं लागायचं की थांब तू आमच्या सोबत आहे. अशी मजल दरमजल करत शेवटी आम्ही राजमाचीवर येऊन पोहोचलो. टेंट न मिळाल्यामुळे आम्हाला किल्ल्यावरच मुक्काम करावा लागणार होता. तेथेही खूप गर्दी होती रात्रभर ट्रेकर येतच होते . आम्ही जेवण करून किल्ल्याच्या दिशेने गेलो तिथे घनदाट जंगल होते आणि त्यामध्ये काजव्यांची लखलखाट अगदी एखाद्या दिवाळी ची लायटिंग दिसावी अशी शोभून दिसत होती.. हे काजवे चमकून आपल्या मादी ला आकर्षून घेतात व आपले अन्न शोधतात. आम्ही काजव्यांचे फोटो काढण्याचे अनेक दुबळे प्रयत्न करत होतो . परंतु ते सर्व विफल होत होते. निसर्गाचा तो एक अविष्कार आहे . बघून डोळे तृप्त झाले मन शांत झालं. काही क्षण फोटोत कैद करता येत नाहीत पण ते अनुभवले की सदैव सोबत राहतात.

      एकतर उशिरा प्लॅन झाल्यामुळे राहण्याची सोय झाली नाही त्यामुळे बाहेरच किल्ल्यांवर राहावं लागणार होतं . परंतु नशिबानं पाऊस नसल्यामुळे आम्हाला तसा फारसा त्रास झाला नाही.    

 सकाळ होताच आम्ही कोंढणे मार्गे सकाळी सर्वसाधारण सातच्या सुमारास निघालो. कोंढणे मार्गे उतरण्याचा रस्ता थोडा कठीण असल्यामुळे पाय घसरत होते .आणि असे डोंगर उतरत उतरत आम्ही गावापर्यंत बारा पर्यंत येऊन पोहोचलो. आणि त्यानंतर तेथून रिक्षा करून पुन्हा कर्जत. तिथुन पुढे ट्रेन ने लोणावळ्याकडे निघालो. जाताना फारसा त्रास झाला नाही परंतु येताना उतरण तीव्र असल्यामुळे आणि ऊन जास्त असल्यामुळे थोडासा त्रास जाणवला आणि एकूण जवळपास चाळीस किलोमीटरचा हा आमचा प्रवास खूप आनंदात गेला, आणि हा ट्रेक आयुष्यभर लक्षात राहील असा होता .

भेटूयात पुन्हा एकदा नवीन ट्रेकची माहिती घेताना …

_ महेश गोरे

Spread the love

Leave a Comment