सूर्यास्त….

सूर्यास्त….

नेहमीप्रमाणे याचा अस्त हा ठरलेलाच असतो… आपल्या आयुष्यात याचं येणं आणि आपल्या आयुष्यातुन याचं जाणं या दोन्ही गोष्टी हाच का ठरवतो??

      एखाद्या वृक्षाची पानगळ झाली की मला वाटतं हा वृक्ष दुःखात असेल आणि पुन्हा पालवी फुटली की हा आनंदला असेल… पण याला वाटतं वृक्षाची पानगळ व त्याची पालवी हे सुख आणि दुःख नाही तर त्या वृक्षाला जगवण्यासाठी झालेला तो अट्टहास होता… यात पानांचं जाणं येणं काहीच महत्व देत नाही का ??… हे देखील सारं हाच का ठरवतो??
         पण याच्यात आणि माझ्यात एक नातं आहे… त्याला नाव नसावं बहुदा… बऱ्याचदा आयुष्यात अशी बरीच नाती असतात त्यांना कोणतंच नाव देणं जमत नाही… कदाचित ते जमवावसं वाटतंही नाही…
 बहुदा हे नातं ना याच वृक्षासारखं असावं… पानगळ झाली काय आणि पालवी फुटली काय झाडात ओलावा कायम टिकुन असतो… आमच्या नात्यात देखील हा ओलावा टिकून आहे…

      तो माझ्यापासून दूर गेला काय किंवा मी त्याच्यापासून दूर गेलो काय फरक नाही पडत… तो उगवतो नेहमीप्रमाणे युगानुयुगे माझ्या सूर्यनमस्कारानंतर मला तेज द्याला…
    एखाद्या वृक्षाची फांदी तुटली की त्यातून दोन फांद्या फुटतात… त्या दोहोंच्या बरोबरीने वाढतात… दोन्ही फांद्या वेगवेगळ्या झाल्या तरी त्यांच मुळ आणि त्यांच्यातला ओलावा एकच तर आहे…. वर्षानुवर्षे…

      हे नातं घट्ट असलं तरी मला त्याला भेटायला माझी तत्व,वेळ,काळ आणि दिशा सारं काही बदलावं लागतं… हा मात्र स्वतःच्या अविर्भावात येतो आणि तसाच अस्ताकडे जातो… या जन्मात मला त्याला अडवायला जमलं नाही पण मी प्रयत्न करील पुढच्या जन्मी त्याला थांबवण्याचा… नाहीच जमलं तर जन्मोनजन्मी मी प्रयत्न करील… एकदिवस तरी त्याला थांबावं लागेल… कारण तो देखील माझ्या शिवाय अपुर्ण आहे….

ये पण तुला समजले नसेलच ना नेहमीप्रमाणे…
नाहीच समजणार…
बरं….
एकदा या सूर्याच्या जागी तुला ठेऊन बघ…
मग समजेल माझ्यातला मी आणि तुझ्यातली तु सदैव एकच तर आहोत…
युगानुयुगे…
तुझा अनामिक…


_ महेश गोरे

Spread the love

2 thoughts on “सूर्यास्त….”

Leave a Comment