वाटतं…..

वाटतं…..

वाटतं कधीतरी…

निरुत्तरीत व्हावं प्रत्येक प्रश्नांची 

उत्तरे शोधताना…

चुकू द्यावीत गणितं

आजवर न चुकू दिलेली…

बेरजा परावर्तित 

व्हाव्यात गुणाकारात 

आणि उत्तराचं व्हावं गाणं

बाकी सोबत गुणगुणायला…

वाटतं कधीतरी 

वल्हवावी नाव नशिबाची

आणि सोडुन द्यावी 

पाण्यात खोलवर

अगदी मार्ग चुकेपर्यंत…

मग व्हावी भेट 

अनपेक्षित नावेची

अनपेक्षित किनाऱ्याशी….

वाटतं कधीतरी

रिक्त करावी

पाण्याची ओंजळ…

न भरुन घ्यावी 

प्राजक्ताची ओंजळ

न कैद करावं या क्षणाला 

अगदी मी हयात असेपर्यंत

मग दरवळेल की तो देखील

अगदी वर्षानुवर्षे…

वाटतं कधीतरी

अशी कविता करावी

ज्याला न अर्थ असावा 

ना भावनेचं बंधन…

ना बोल असावेत 

ना शब्दांचं बंधन….

मग चुकेल कविता

फाटूनही जाईल 

कदाचित पान

पुन्हा शब्द चुकवायला…..

©®

      ✍महेश ग गोरे.

Spread the love

Leave a Comment